Type Here to Get Search Results !

पटोलेंच्या वक्तव्यावर शरद पवारांची नाराजी?; काँग्रेस नेते-पवारांची सल्लामसलत

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: केंद्रातील भाजप सरकारच्या मनमानीच्या विरोधात राज्यात शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस मिळून तयार झाली असली, तरी काही नेत्यांच्या स्वबळाच्या खुमारीने आघाडीच्या घटक पक्षात कुरुबुरी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. मात्र, या भेटीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नव्हते. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मुंबईत शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. या वेळी काँग्रेसच्या तिन्ही नेत्यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर महाविकास आघाडीतील कुरबुरींवर चर्चा केल्याचे कळते. आपासात काही कारण नसताना विरोधकांच्या हातात आयते कोलीत देण्याच्या काही नेत्यांच्या प्रकाराबाबत या भेटीत चर्चा झाल्याचे सूत्रांकडून कळते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण यावर बैठकीत चर्चा झाली. विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील, हे शरद पवार यांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे. त्याशिवाय दोन्ही काँग्रेसच्या ताब्यात राज्यातील मोठ्या सहकारी संस्था आहेत. त्या संस्थांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार नवीन सहकार खात्याच्या माध्यमातून करीत आहे. तथापि, सहकार हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. याबाबतही या भेटीत चर्चा झाल्याचे समजते. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील आणि राज्यातील दोन काँग्रेसच्या नेत्यांनी पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यांच्या सोबत नसल्यामुळे पटोले यांना महत्त्वाच्या भेटीपासून दूर ठेवल्याची चर्चा होती. शरद पवार यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. 'लहानसहान नेत्यांच्या वक्तव्यावर मी बोलत नाही,' असे शरद पवार यांनी बारामतीत स्पष्ट केले होते. आरक्षणप्रश्नी चर्चा आगामी काळात राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर विरोधक आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने नुकत्याच मुंबईत झालेल्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे ठराव सभागृहात मंजूर करून ते ठराव केंद्र सरकारकडे पाठवण्याचे ठरविले आहे. या प्रश्नावरही काँग्रेस नेते आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांचा सल्ला घेतल्याचे बोलले जात आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2U8mZ1Z

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.