Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रात पुन्हा धक्कादायक घटना! पैशांसाठी २ दिवस मृत रुग्णावर उपचार; डॉक्टरला अटक

: मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून मृतदेहावर दोन दिवस उपचार केल्याचा प्रकार इस्लामपुरात उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणूक व मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी इस्लामपूर ( जिल्हा; सांगली) येथील आधार हेल्थ केअरचा डॉ. योगेश रंगराव वाठारकर याला अटक करण्यात आली आहे. डॉ.वाठारकर याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होवून अटक झाल्याने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कासेगाव येथील आचारी काम करणाऱ्या सलीम हमीद शेख यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, डॉ. वाठारकर याचे शहरात बस स्थानकाजवळ माणकेश्वर चित्र मंदिर परिसरात आधार हेल्थ केअर आहे. या हॉस्पिटलमध्ये गेल्या दीड वर्षापासून करोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. २४ फेब्रुवारी रोजी सलीम शेख यांनी त्यांची आई सायरा ( वय ६०) यांना उपचारासाठी आधार हेल्थ केअर मध्ये दाखल केले होते. तेथे डॉ. योगेश वाठारकर याने उपचार केले. रुग्ण सायरा यांचा नॉन कोविड उपचारादरम्यान ८ मार्चला सकाळी पावणे बारा वाजता मृत्यू झाला. ही माहिती डॉक्टरांनी मुलगा सलीम शेख यांच्यापासून लपवली आणि मृतदेहावर उपचार सुरू ठेवले. दोन दिवसांनी डॉ.वाठारकर याने नातेवाईकांना बोलावून रुग्ण मृत झाल्याची माहिती दिली. वास्तविक आईच्या उपचराबाबत दोन दिवस माहिती न दिल्याने शंका आली होती. सलीम यांना १० मार्चपर्यंत तुमच्या आईवर उपचार केल्याचे सांगून ४१ हजार २८९ इतके ज्यादा बिल बनावट कागदपत्रे तयार करून दिले आणि ते भरून घेतल्याचा उल्लेख फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. दोन दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवून मृतदेहाची विटंबना करून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत बुधवारी रात्री उशिरा डॉ. योगेश वाठारकर याला अटक करण्यात आली. त्याच्यावर भा.दं.वि.कलम ४०६, ४२०, ४६४, २९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख तपास करीत आहेत. सायरा शेख यांचा आधार हेल्थ केअरमध्ये उपचारादरम्यान ८ मार्चला मृत्यू झाला. याबाबतची नोंद इस्लामपूर नगरपरिषदेच्या रेकॉर्डवर आहे. मृत्यू प्रमाणपत्राच्या नोंदीवरून मृत्यू ८ मार्चला झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, डॉक्टरांनी मृतदेह १० मार्चला ताब्यात दिला. यामुळे नेमके काय घडले, ही परिस्थिती नातेवाईकांनी जाणून घेत डॉक्टरविरोधात तक्रार केली. तसंच या प्रकरणी पाठपुरावा केला. सायरा शेख दोन दिवस जिवंत असल्याचे भासवून जादा बिलाची आकारणी करत मृतदेहाची विटंबना केल्याचे अखेर बिंग फुटले आणि डॉ. वाठारकर अलगद फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jNTDAu

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.