Type Here to Get Search Results !

नागपूरमध्ये करोनानंतर आता नवं संकट; डेंग्यूच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ

: गेल्या १८ महिन्यांपासून राज्यातील इतर भागांप्रमाणे नागपूर जिल्हा कोव्हिड आणि ब्लॅक फंगसशी झुंज देत आहे. त्यामुळे उपराजधानीची संपूर्ण आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली आहे. हे संकट अद्याप टळलेलं नसतानाच आता डेंग्यू आजारानेही डोके वर काढलं आहे. अवघ्या सात दिवसांमध्ये जिल्ह्यात १८९ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यापैकी १४४ रुग्ण एकट्या नागपूर शहरातील आहेत. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असताना मनपाचा आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. स्वच्छतेचा पुरस्कार मिळाल्याचा मोठेपणा मिरवणाऱ्या शहरात डेंग्यूच्या डासांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. गेल्या ७ दिवसांत पूर्व विदर्भात आढळलेल्या २१३ डेंग्यूग्रस्तांपैकी १८९ रुग्ण हे नागपूर जिल्ह्यातील आहेत. त्यातही १४४ रुग्ण एकट्या शहराच्या हद्दीतील आहेत. करोना नियंत्रणासाठी ठोस पावले उचलल्याचे सांगणारी मनपा डेंग्यूच्या बाबतीत मात्र गाफील आहे. शहरात डासांच्या नियंत्रणासाठी कोणतीही फवारणी वा उपाययोजा केल्या जात नसल्याने दाट लोकवस्तीच्या भागांत डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपाकडून अपेक्षित पाऊल उचललं जात नसल्याची सर्वसामान्यांची तक्रार आहे. 'पावसाळा सुरू झाल्यानंतरही कुलरच्या टाक्या स्वच्छ करून कोरड्या करणे गरजेचे आहे. शिवाय पाण्याची टाकी, साठवलेले पाणी, वापर नसलेल्या विहिरी, खड्ड्यातले पाणी यातून डासांचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे आवश्‍यक आहे. मनपाला त्याचाही विसर पडल्याचे दिसत आहे,' असं नागपूर येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण शिंगाडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आगामी काळात तरी महापालिका याबाबत तातडीने उपाययोजना करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3e7rbWG

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.