Type Here to Get Search Results !

लेखक वाचकांमधील दुवा हरपला! ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचं निधन

मुंबई: 'वाचणाऱ्याची रोजनिशी' लिहून वाचकांशी थेट संवाद साधणारे मराठीतील प्रख्यात कवी, संपादक व सामाजिक कार्यकर्ते यांचं शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. पेण येथील राहत्या घरी झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काळसेकर यांच्या निधनामुळे नवोदित लेखक, कवींचा हक्काचा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. ( Passes Away) सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील काळसे गावी जन्मलेल्या काळसेकर यांचं शालेय शिक्षण सिंधुदुर्गातच झालं. मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ त्यांनी मासिक ज्ञानदूत व टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांनी नोकरी केली. काळसेकर यांच्या वाङ्‌मयीन कारकिर्दीची सुरुवात काव्य लेखनानं झाली. सुरुवातीला महाविद्यालयाच्या नियतकालिकातून, नवाकाळ, मराठा यांसारख्या वर्तमानपत्रातून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर विविध वाङ्‌मयीन नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. १९७१ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह इंद्रियोपनिषद् प्रकाशित झाला. या कविता संग्रहानं त्यांना साहित्य वर्तुळात ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात चौफेर मुशाफिरी केली. कविता, अनुवाद, गद्य असे वेगवेगळे साहित्य प्रकार हाताळले. 'वाचणाऱ्याची रोजनिशी' या त्यांच्या पुस्तकाला २०१४ सालच्या 'साहित्य अकादमी' पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. सतीश काळसेकर हे १९६० च्या दशकात उदयाला आलेल्या लघुअनियतकालिकांच्या चळवळीतील बिनीचे शिलेदार होते. साहित्यापासून ते जगण्यापर्यंत प्रस्थापितांचे तथाकथित मानदंड नाकारणारी ही चळवळ होती. तारा-जीएल रेड्डींपासून नारायण सुर्वेपर्यंत आणि अरुण कोलटकरांपासून भालचंद्र नेमांडेपर्यंत अनेक जण त्यांच्यासोबत होते. जगण्याबद्दल व माणसांबद्दल त्यांनी कुठल्याही प्रकारची कटुता मनात येऊ दिली नव्हती. ते कायमच संवादी राहिले. त्यांच्या याच स्वभावामुळं त्यांनी सर्वच क्षेत्रात अनेक माणसं जोडली होती. सतीश काळसेकर यांची साहित्य संपदा कवितासंग्रह: इंद्रियोपनिषद् (१९७१), साक्षात (१९८२), विलंबित (१९९७) अनुवाद: लेनिनसाठी (१९७७, लेनिनवरच्या विश्वातील कविता-अनुवाद व संपादन), नव्या वसाहतीत (२०११, अरुण कमल यांच्या हिंदी कवितासंग्रहाचा मराठी अनुवाद) गद्यलेखन: वाचणार्‍याची रोजनिशी (२०१०), पायपीट (२०१५) संपादन: मी भयंकराच्या दारात उभा आहे (नामदेव ढसाळ यांची कविता, संपादन – प्रज्ञा दया पवारसह, २००७), आयदान: सांस्कृतिक ठेवा (संपादन- सिसिलिया कार्व्हालोसह, २००७), निवडक अबकडइ (संपादन- अरुण शेवतेसह, २०१२)


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WgDj1t

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.