Type Here to Get Search Results !

'विम्बल्डनमध्ये प्रेक्षक मास्कविना; असा दिवस भारतात कधी?'

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः इंग्लंडमधील लंडनमध्ये रविवारी झालेल्या विम्बल्डन पुरुष एकेरी अंतिम सामन्याच्या वेळी नोवाक जोकोविक हा रॉजर फेडरर व रफाएल नदाल यांच्या वीस ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी करत असताना सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या असतील; पण मुंबई उच्च न्यायालयासाठी जणू त्या टेनिस कोर्टमध्ये मास्कविना बसलेल्या प्रेक्षकांचे दृश्य पाहण्यासारखे होते. 'एकही प्रेक्षक मास्क लावून बसलेला नव्हता. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवरही तो आत्मविश्वास तिथे लोकांमध्ये आला आहे, तसा दिवस भारतात कधी येईल', असा प्रश्न उच्च न्यायालयाने मंगळवारी उपस्थित केला. करोनाविषयक जनहित याचिकांवरील सुनावणीच्या वेळी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे राज्य सरकारकडून होत असलेल्या उपाययोजनांविषयी माहिती देत असताना मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने त्यांच्यासमोर हा प्रश्न उपस्थित केला. 'तुम्ही विम्बल्डनचा पुरुष एकेरीचा अंतिम सामना पाहिला का? त्या सामन्याच्या वेळी टेनिस कोर्टमध्ये एकही प्रेक्षक मास्क घालून बसलेला नव्हता. स्टेडियममध्ये एक भारतीय क्रिकेटपटूही होता आणि त्यानेही मास्क घातलेला नव्हता. तिथे लोकांमध्ये तसा आत्मविश्वास आला आहे. असा दिवस भारतात कधी येईल', अशी विचारणा खंडपीठाने कुंभकोणी यांना केली. त्याचवेळी इतर उपायांसह लसीकरण वेगाने केले तर तो दिवस निश्चितच येईल, असा आशावादही न्यायमूर्तींनी व्यक्त केला. 'ढिलाई येता कामा नये' 'ईशान्य भारतातील दोन राज्यांमध्ये करोनाची तिसरी लाट सुरू होत असल्याचे वृत्त वाचायला मिळत आहे. त्यामुळे आपल्या राज्यातही तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय आधीच करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात आपण सध्या चांगल्या स्थितीत असलो तरी या गंभीर प्रश्नावर सरकारी प्रशासनांकडून कोणतीही ढिलाई येता कामा नये', अशा शब्दांत खंडपीठाने राज्य सरकारला बजावले. तसेच न्यायालयाच्या आतापर्यंतच्या निर्देशांचे किती पालन झाले आणि संभाव्य तिसऱ्या लाटेविषयी खबरदारीचे उपाय काय, याचा तपशील देण्याचे निर्देश देऊन खंडपीठाने पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी ठेवली. संपर्क क्रमांकांना देणार व्यापक प्रसिद्धी 'म्युकरमायकोसिसवरील अॅम्फोटेरसिन इंजेक्शन आणि करोनाविषयक जीवरक्षक इंजेक्शन टोसिलीझुमॅब यांचा सरकारी रुग्णालयांमध्ये सध्या कोणताही तुटवडा नाही. खासगी रुग्णालयांमध्ये त्यांचा तुटवडा भासला आणि रुग्णांसाठी तातडीची आवश्यकता असल्यास त्यांच्या मदतीसाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची विभागीय स्तरावर नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. त्यांच्या नावांची यादी त्यांच्या संपर्क क्रमांकासह जाहीर केली असून त्याला वर्तमानपत्रे व वृत्तवाहिन्यांवरून व्यापक प्रसिद्धी दिली जाईल,' अशी माहिती महाधिवक्तांनी न्यायालयाला दिली. 'धूम्रपानाच्या धोक्याबद्दल अहवाल' 'करोनाचा संसर्ग होऊन मृत्यू ओढवण्याच्या बाबतीत धूम्रपानाने धोका वाढतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) २८ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे', असे जनहित याचिकादार नीलेश नवलखा यांच्यातर्फे अॅड. राजेश इनामदार यांनी निदर्शनास आणले. पूर्वी राज्य सरकारनेही टाटा स्मारक रुग्णालयाच्या तज्ज्ञांचा अशाप्रकारचा अहवाल दिला होता. त्यामुळे त्या अहवालाला दुजोरा देणारा डब्ल्यूएचओचा अहवाल असल्याकडे खंडपीठाने महाधिवक्तांचे लक्ष वेधले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ibQuYP

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.