Type Here to Get Search Results !

मोदी मंत्रिमंडळ विस्तारात पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा का डावललं? 'हे' आहे कारण

कोल्हापूर : केंद्रिय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, पण यामध्ये पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रातील एकाही नेत्याला संधी न मिळाल्याने या भागातील मंत्रिपदाचा दुष्काळ कायम राहिला. मंत्रिपदासाठी अनेकांची नावे चर्चेत आली, प्रत्यक्षात मात्र कुणाचीच वर्णी लागली नाही. चार जिल्ह्यातील सातपैकी पाच खासदार भाजपचे असतानाही त्यातील बहुतेकजण वादग्रस्त असल्यानेच पक्षाने त्यांच्याकडे कानाडोळा केल्याचे समजते. कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या चार जिल्ह्यात गेल्या सात वर्षात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली. मोदी लाटेत लोकसभा निवडणुकीत कमळ फुललं, नंतर त्याचा फायदा विधानसभेलाही झाला. चंद्रकांत पाटील हे राज्यातील दोन नंबरचे मंत्री झाले. नंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांनी या भागात संघटनात्मक पातळीवर मेहनत घेतली आणि कमळ फुलवलं. त्यामुळे जिल्ह्यातील सहापैकी तीन खासदार भाजपचे निवडून आले. शिवसेनेचे जे दोन खासदार निवडून आले, त्यामध्येदेखील भाजपचाच सिंहाचा वाटा आहे. संजय पाटील, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे भाजपचे लोकसभेतील खासदार आहेत. याशिवाय छत्रपती उदयनराजे व संभाजीराजे हे भाजपचे राज्यसभा सदस्य आहेत. यातील काहींची मंत्रिपदासाठी नावे चर्चेत आली. प्रत्यक्षात मात्र कुणाच्याच गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली नाही. काँग्रेस सत्तेवर असताना या भागातील सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि प्रतिक पाटील यांना मंत्रिपदावर संधी मिळाली. पण, भाजप सत्तेवर आल्यापासून पक्षाची ताकद वाढली असली तरी मंत्रीपदाचे बक्षीस या भागाला अजूनही मिळाले नाही. नाईक- निंबाळकर आणि छत्रपती उदयनराजे यांना राज्यमंत्री म्ह्णून लॉटरी लागणार असल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात नारायण राणे यांच्यासह इतर चौघांना मंत्रिपद मिळाले. पश्चिम महाराष्ट्राची पाटी कोरीच राहिली. शेजारच्या कोकणला सतत संधी मिळत असताना गेल्या अनेक वर्षात हा भाग मंत्रिपदापासून वंचित राहत असल्याने काही महत्त्वाचे प्रश्न सुटण्यातही अडचणी कायम आहेत. भाजपचे या भागात पाच खासदार असले तरी यातील प्रत्येकजण वादग्रस्त असल्याचा फटकाही मंत्रिपद न मिळण्यात अडथळा ठरल्याची शक्यता आहे. सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातीचा दाखला अवैध ठरवल्याने सध्या हे प्रकरण वादग्रस्त आहे. खासदार उदयनराजे यांचा रोखठोक स्वभाव भाजपला नडेल या भीतीने पक्ष त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असण्याची शक्यता आहे. भाजपला नवा चेहरा देण्यासाठी संभाजीराजेंना पक्षाने राष्ट्रपतीनियुक्त खासदार केले. पण, त्यांनी भाजपचा शिक्का बसू नये म्हणून सतत प्रयत्न केल्याने त्यांचे नाव मंत्रिपदाच्या चर्चेत येणे शक्य नाही. मराठा आरक्षण आंदोलनात तर भाजपचे नेते आणि त्यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. सांगलीचे संजय पाटील भाजपचे खासदार असले तरी पक्षातूनच त्यांना विरोध आहे. त्यांचे प्रेम राष्ट्रवादीवर अधिक असल्याची चर्चा आहे. नाईक-निंबाळकर प्रथमच निवडून आले आहेत, त्यांचा अजूनही प्रभाव दिसत नाही. यामुळेच कदाचित विविध नावांची केवळ चर्चा झाली, प्रत्यक्षात मात्र एकाच्याही गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली नाही. या भागात पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद होती. तरीही या पक्षांनी केंद्रात मंत्रिपदासाठी या भागाला फारसे प्राधान्य दिले नाही. मात्र तिघांना संधी देत काँग्रेसने राजकीय समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. आता केंद्रात भाजपची सत्ता आहे, या भागात पक्षाची ताकद वाढली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मंत्रिमंडळ विस्तारात या अपेक्षांची पूर्तता न झाल्याने आता आगामी विस्ताराची प्रतिक्षा लागली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jSMcI8

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.