Type Here to Get Search Results !

देशभरातील करोनाबाधितांची लाखो रुपयांची फसवणूक; बिहारमधून सहा जणांच्या टोळीला अटक

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: करोना काळामध्ये तुटवडा भासणाऱ्या रेमडेसीवीर, प्लाझ्मा, ॲम्बुलन्स तसेच ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याची जाहिरातबाजी करून देशभरातील करोनाबाधितांची फसवणूक करणारी टोळी मुंबई सायबर पोलिसांनी उघडकीस आणली आहे. उच्चशिक्षित तरुणांचा भरणा असलेल्या सहा जणांच्या टोळीला बिहारमधून अटक करण्यात आली. या टोळीने करोनाचा कहर सुरू असताना अडचणीत असलेल्या लोकांची फसवणूक करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आपल्या कंपनीच्या नावाचा वापर करून फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप तसेच इतर समाज माध्यमांवर जाहिरात करून सर्वसामान्य लोकांना फसवले जात असल्याची तक्रार सिप्ला कंपनीच्या वतीने सायबर पोलिसांकडे करण्यात आली होती. सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सहस्त्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मंगेश मजगर, सहायक निरीक्षक अलका जाधव यांच्या पथकाने तपास सुरू केला. समाजमाध्यमांवरील जाहिराती, सर्वसामान्य लोकांना येणाऱ्या फोन कॉल्सचा तपशील, पैसे पाठवण्यासाठी दिली जाणारी बँक खाती यांचा बारकाईने अभ्यास केला असता यामध्ये बिहार कनेक्शन समोर आले. सिप्ला कंपनीला देशभरातून तक्रारींचे इमेल आले होते. या माहितीच्या आधारे सायबर पोलिसांनी बिहारच्या बिहारशरीफ या शहरात एका कार्यालयात छापा टाकला. हे कार्यालय नसून एक कॉल सेंटर असल्याचे या कारवाईतून उघड झाले. या ठिकाणी काम करत असलेल्या धनंजय पंडित, शरवण पासवान, धर्मजय प्रसाद, नितीश कुमार प्रसाद, सुमंत कुमार प्रसाद या पाच जणांना अटक केली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. हे तरुण उच्चशिक्षित असून आणखी काही आरोपींचा शोध सुरू असल्याचे सहपोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले. ३२ बँक खाती, १०० पेक्षा अधिक सीमकार्ड पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये या टोळीने बनावट पॅनकार्ड, आधारकार्डचा वापर करून ३२ बँक खाती उघडल्याचे समोर आले आहे. ही बँक खाती सिप्ला कंपनीची असल्याचे भासवण्यात आले होते. २१० जणांकडून या आरोपींनी ६० लाखांची रक्कम जमा केल्याचे बँक तपशीलमधून आढळून आले आहे. इतकेच नाही तर खोटी कागदपत्रांच्या आधारे या सर्वांनी पश्चिम बंगालमधून १०० पेक्षा अधिक सीम कार्ड खरेदी केले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jTBP6W

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.