Type Here to Get Search Results !

कोल्हापुरातील करोना संसर्ग कमी होत नसताना केंद्रीय पथकाने दिला आश्चर्याचा धक्का

: कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून रोज दीड हजारांपेक्षा अधिक करोना रूग्ण (Kolhapur Coronavirus Updates) आढळत आहेत, मात्र तरीही ‘येथे गंभीर काहीच नाही, साथ उशिरा सुरू झाली आहे, त्यामुळे उशिराच ओसरेल’ असं स्पष्टीकरण देत केंद्रीय आरोग्य पथकाने आश्चर्याचा धक्काच दिला आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहीम आणखी वाढवण्यासाठी केंद्राकडे जादा लशींची मागणी करणार असल्याचे या समितीचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचा कहर कायम आहे. अनेक उपाययोजना करूनही करोना प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने दुसऱ्यांदा भेट दिली. दरम्यान, यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कोल्हापुरात येऊन आढावा घेतला होता. त्यांच्या आदेशानंतरही फारसा फरक पडला नाही. मंत्री टोपे पुन्हा शुक्रवारी कोल्हापुरात येणार आहेत. यातून कोल्हापुरात करोनाची स्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट होते. गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा रोज दीड हजार ते दोन हजारापर्यंत आहे. सध्या १२ हजारांहून अधिक रूग्णांवर उपचार सुरू आहेत. रोज ३० ते ४० जणांचा बळी जात आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना सूचविण्यासाठी आलेल्या पथकाने सकाळी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज्य सर्वेक्षण अधिकारी व या केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. आवटे म्हणाले, राज्याच्या तुलनेत करोना संसर्गाचा आलेख कोल्हापूर जिल्ह्यात उशिरा सुरू झाला. त्यामुळे तो उशिरा ओसरेल. येथे गंभीर परिस्थिती नाही. येथील लोकांनी चांगले सहकार्य केल्याने आणि लसीकरणही जादा झाल्याने घाबरण्याचे काहीच कारण नाही. पॉझिटिव्हिटी दर सोळा टक्क्यांवरून दहा टक्क्यांपेक्षा कमी आला आहे. मृत्यू दरही शेकडा २.९ वरून २.६ वर आला आहे. तरीही गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या मृत्यूचे ऑडिट करण्यात येत असून त्याचा अभ्यास करून मृत्यूदर आण्खी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. डॉ. आवटे म्हणाले, देशाच्या तुलनेत राज्यात करोनाचा कहर जास्त आहे. यामुळे राज्याबरोबरच कोल्हापूरलाही जादा लस मिळण्यासाठी केंद्रीय पथक केंद्र सरकारकडे मागणी करणार आहे. तिसरी लाट आल्यास त्याला रोखण्यासाठी आत्तापासूनच तयारी करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य १७५ पूरग्रस्त गावात शंभर टक्के लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. व्यापारी आक्रमक, दुकाने उघडली पॉझिटिव्हिटी दर कमी होत नसल्याने सरकारने या जिल्ह्यातील निर्बंध कायम ठेवले आहेत. पण ९० दिवसापेक्षा अधिक दिवस दुकाने बंद असल्याने व्यापारी आक्रमक झाले आहेत. बहुतांशी दुकानदारांनी सरकारचे निर्बंध झुगारून दुकाने सुरू केली आहेत. सरसकट सर्वांना दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी यासाठी शुक्रवारी व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासन व दुकानदार यांच्यात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TdtjEV

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.