Type Here to Get Search Results !

कल्याणः लशीच्या टोकनसाठी लागणार आता आधारकार्डची प्रत

काळाबाजार रोखण्यासाठी पालिकेचा उपाय मटा इम्पॅक्ट म. टा. वृत्तसेवा, कल्याण कल्याण-डोंबिवलीत मंगळवारी लसीकरणासाठी नागरिकांची लांबच लांब रांग लागली होती. कल्याण पश्चिमेकडील अत्रे रंगमंदिराच्या प्रवेशद्वारापासून सुरू झालेली रांग थेट शिवाजी चौकात पोहोचली होती. एक हजार टोकन असल्यामुळे रांगेतील सर्वांना टोकनचे वाटप करण्यात आले. त्यात, करोना लशीचे टोकन ४०० रुपयांत काळ्या बाजारात विकले जात असल्याच्या 'मटा'च्या वृत्ताची दखल घेत केडीएमसी प्रशासनाने आधारकार्डाची प्रत घेऊनच टोकनचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. करोना लशीच्या अनियमित पुरवठ्यामुळे लस उपलब्ध झाल्याचा मेसेज येताच पहाटेपासून अनेक जण ऑफलाइन टोकनसाठी लांबच लांब रांगा लावतात. याचाच फायदा घेत काही नागरिकांनी टोकनचा काळा बाजार सुरू केला होता. पहाटे रांगेत उभे राहून टोकन मिळवायचे आणि ते ४०० ते ५०० रुपयांत गरजूंना विकण्याचे प्रकार उघडकीस आले होते. याबाबतचे वृत्त 'मटा'ने प्रसिद्ध केल्यानंतर पालिका प्रशासनाने टोकन घेणाऱ्या व्यक्तीला आधारकार्डाची प्रत देणे बंधनकारक केले आहे. लस घेताना आधारकार्डाची प्रत तपासणी करूनच लस दिली जाणार असल्यामुळे गैरप्रकाराला आळा बसेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र अत्रे रंगमंदिरात एक हजार नागरिकांच्या लसीकरणाची व्यवस्था केली जात असल्यामुळे इतक्या नागरिकांच्या आधारकार्डची तपासणी करणे थोडे कठीणच असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील आठवड्यात शनिवारी लसीकरण झाल्यानंतर रविवार आणि सोमवारी लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद होते. यामुळे मंगळवारी लस असल्याचे समजताच पहाटेपासून नागरिकांनी लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या. अत्रे रंगमंदिरात मंगळवारी पहाटेपासून नागरिकांनी टोकनसाठी गर्दी केली होती. सकाळी ६.३० वाजता ही रांग थेट एक किमी लांब शिवाजी चौकापर्यंत पोहोचली होती. या नागरिकांना आठ वाजता टोकनवाटप करत त्यांना लसीकरणासाठी वेळ देण्यात आली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Vhvvfl

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.