Type Here to Get Search Results !

पावसाच्या विश्रांतीनंतर रस्त्यावर जागोजागी खड्डे; मुंबईकरांची या त्रासातून सुटका कधी?

म. टा. प्रतिनिधी, मुंबईः मुसळधार पावसाने मंगळवारी उसंत घेतल्यानंतर पावसाळ्यापूर्वी भरण्यात आलेले खड्डे पावसात वाहून गेल्याने मुंबईकरांना आता प्रवासायातना सहन कराव्या लागत आहेत. शहरातील लहान-मोठ्या रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना धक्के खात प्रवास करावा लागत आहे. सामान्यांना लोकलमधून प्रवासमुभा नसल्याने रस्तेप्रवास करताना त्यांना प्रचंड प्रवासयातना सहन कराव्या लागत आहेत. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, कांजुरपासून दादर, परळ, लालबागसह अंधेरी, सेंट्रल, वांद्रेमधील सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसत आहेत. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने त्यांच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवर केवळ ११ खड्डे शिल्लक असल्याचा दावा केला होता. पावसाने खड्ड्यांमधील राडारोडा वाहून गेल्यानंतर निकृष्ट दर्जाचे कामकाज उघडे पडले आहे. गटारावर झाकण नसणे, गतिरोधक उघडणे, दोन रस्त्यांची जोडणी असलेल्या ठिकाणी खड्डे अशा सर्वच तक्रारींचा समाजमाध्यमांवर पूर आल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी पाऊस नसला तरी खड्ड्यांमुळे शहरातील एलबीएस मार्ग, मुलुंड-गोरेगाव लिंक रोड, डॉ. आंबेडकर मार्ग आणि मेट्रोची कामे सुरू असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी दिसून आली. मुलुंड चेक नाक्यासह अनेक ठिकाणी स्थानिक व वाहतूक पोलिसांनी रस्त्यांवर उतरून खड्डे भरण्याचे काम केले. मात्र ते मर्यादित होते. पावसाळ्यातील चार महिने रस्ते पाण्याखाली जाणार आणि पाणी ओसरल्यावर खड्डे निर्माण होणार, या त्रासातून मुंबईकरांची सुटका नेमकी होणार , असा सवाल जनसामान्यांमधून विचारण्यात येत आहे. दरम्यान, सोमवार ते शुक्रवार मुंबईत जोरदार अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. रविवार, सोमवार दोन दिवस धो-धो कोसळल्यानंतर मंगळवारी मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबई हळूहळू पूर्वपदावर आली. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने साफसफाई करण्यात मंगळवारचा दिवस गेला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BsqNvJ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.