: प्रियकराने आधी वचन देऊन नंतर लग्नाला नकार दिल्याच्या नैराश्यातून एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अंजली सुभाष वानखडे असं मृत युवतीचे नाव आहे, तर कुणाल मेश्राम असं आरोपी युवकाचे नाव आहे. शेजारी राहणाऱ्या दोघांनी एकच लायब्ररी जॉईन करुन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला होता. सतत तीन वर्ष मित्र-मैत्रीण म्हणून राहिले आणि नंतर मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. त्यानंतर दोघेही भावी आयुष्याचे स्वप्न रंगवू लागले. अंजली ही एक बँकेशी संबंधित परीक्षा पास झाली. परंतु मित्र कुणालने तिला नोकरी करण्यास नकार दिला. लग्नानंतर मी नोकरी करेन, असं त्याने अंजलीला सांगितलं. त्यानंतर कुणाल रेल्वे विभागात नोकरीला लागला. मात्र नंतर तो अंजलीला टाळू लागला आणि लग्न करण्यास नकार देऊ लागला. यातून दोघांमध्ये वाद सुरू झाले. कुणाल आणि त्याच्या कुटुंबाने अंजलीला शिवीगाळ केल्याचा वानखेडे कुटुंबाचा आरोप आहे. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानेच लग्नाला टाळाटाळ सुरू केल्याने नैराश्यात गेलेल्या अंजलीने विष प्राशन केलं. यावेळी उपचारासाठी रुग्णालय नेताना तिनं हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत आपल्या वडिलांना माहिती दिली. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री तिचं निधन झालं. अंजलीचे वडिल दोन दिवसांपासून याप्रकरणी आरोपींविरोधात तक्रार देण्यास गेल्यानंतर पोलिसांकडून दाद दिली जात नव्हती. शनिवारीही अंजलीच्या कुटुंबियांनी भर पावसात पोलिस स्टेशनबाहेर आक्रोश केला. तसंच तिच्या नातेवाईकांनी याप्रकरणी पोलिस आयुक्त आरती सिंग यांना निवेदन दिल्यानंतर आणि कुटुंबियांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत अंजलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यानंतर शनिवारी अखेर कुणाल मेश्राम याच्याविरोधात कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3y66eDj