मुंबई : कोकण, प. महाराष्ट्र विशेषत: महाडनजिक घडलेल्या घटना पाहता तातडीची मदत तसेच रोखीने आर्थिक मदत सुद्धा राज्य सरकारच्या वतीने लगेच दिली जावी. पिण्याचे पाणी, अन्न, कोरोनाचा कालखंड पाहता आरोग्य सुविधा या बाबी प्राधान्यक्रमात असल्याच पाहिजेत अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. इतकंच नाहीतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागात सातत्याने येणारी संकटं पाहता थोडा दूरगामी विचारसुद्धा राज्य सरकारने करण्याची गरज असल्याचं फडणवीस म्हणाले. तळिये या गावात घरे नव्याने बांधण्यात आली आहे. पण सुरक्षित ठिकाणी घरं बांधून सर्व नागरी सुविधा नागरिकांना निर्माण करून द्याव्यात असे करताना धोकादायक क्षेत्राबाहेर हे पुनर्वसन असावे. इतर धोकादायक गावे तत्काळ ओळखून त्यासाठीचे सर्वेक्षण तातडीने करण्यात यावे अशा सूचना फडणवीसांना केल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये ‘रिस्क असेसमेंट‘ तातडीने करण्यात यावे. कोकणची भौगोलिक स्थिती आणि सातत्याने येणारी संकटं पाहता कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्यात यावी. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WfX4pT