Type Here to Get Search Results !

नगर जिल्ह्यातील 'या' २२ गावांत पुन्हा कडक लॉकडाऊन; पुन्हा शाळेत क्वारंटाइन करणार

म. टा. प्रतिनिधी, नगर: पारनेर तालुक्यातील करोना स्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दखल घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तेथे उपाययोजना हाती घेतल्या आहेत. करोनाचा प्रादूर्भाव जास्त असलेल्या २२ गावांत आठ दिवसांचा कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. सोबतच शंभर टक्के चाचण्या आणि गावातील शाळांमध्ये विलगीकरणही करण्यात येणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून अहमदनगर जिल्ह्यात करोनाची लाट उतरणीला लागली, मात्र पारनेर तालुक्यातील रुग्णसंख्या तुलनेत जास्तच राहिली. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण पारनेर तालुक्यात आढळत होते. काहींच्या मते मुंबईहून येणाऱ्या लोकांमुळे हे प्रमाण वाढत आहे, तर काहींच्या मते मोठ्या कोविड सेंटरमुळे एकाच ठिकाणी गर्दी होत असल्याने आणि तेथे दक्षता घेण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने करोनाचा प्रसार होत आहे. आता मात्र प्रशासनाने पारनेरवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पारनेर तालुक्यात भेटी दिल्या. त्यानंतर उपाययोजांनाचे निर्णय घेण्यात आले. वाचाः तहसिलदार ज्योती देवरे यांनी सांगितले की, तालुक्यातील निघोज, पठारवाडी, धोत्रे, टाकळी ढोकेश्वर, वडगाव गुंड, शिरसुले, रायतळे, लोणीमावळा, भाळवणी, पिंप्री जलसेन, जामगाव, पठारवाडी, जवळा, हत्तलंखिंडी, पिंपळगाव रोठा, लोणी हवेली, पोखरी, वनकुटे, काकणेवाडी, खडकवाडी, सावरगाव, वाळवणे या गावांत कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. पुढील आठ दिवस या गावांत फक्त औषध दुकाने भाजीपाला, दूध आणि कृषी सेवा केंद्र सुरू राहणार आहेत. लग्न, वाढदिवस, उद्घाटन किंवा कोणताही समारंभ परवानगी शिवाय घेता येणार नाही. बाहेरुन आलेले पाहुणे सात दिवस शाळेत विलगीकरणात ठेवण्यात येणार आहेत. विविध ठिकाणी चालक म्हणून काम करणाऱ्या गावातील नागरिकांनी गावात आपल्या घरी न राहता शाळेतील विलगीकरणातच राहायचे आहे. शिक्षक ग्रामसेवक तलाठी मुख्यालय सोडणार नाहीत. वॉर्डनिहाय प्रत्येक गावात शंभर टक्के कुटुंब तपासणी व करोना चाचण्या करण्यात येणार आहेत. यात आढळून आलेल्या रुग्णांना सक्तीने कोविड केअर सेंटरमध्ये आणले जाणार आहे. विनामास्क फिरणारे, चौकात पारावर विनाकारण बसणारे, फिरणारे यांचे फोटो काढुन त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोविड सुसंगत वर्तन नसलेल्यांना यापुढे समज न देता सरळ गुन्हे दाखल केले जाणार आहेत, असेही तहसिदार देवरे यांनी सांगितले. वाचाः पारनेर तालुक्यात नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सर्वाधिक आहे. सध्या तालुक्यात साडेचारशेहून अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत. आतापर्यंत तालुक्यातील सुमारे दोनशे जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यातही बहुतांश दिवस पारनेरची रूग्ण संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. १ जुलै ५६, २ जुलै ७४, ३ जुलै ५४, ४ जुलै ५८, ५ जुलै ५७, ६ जुलै ४८, ७ जुलै ६१ व ८ जुलैला ७६, ९ जुलै ८४ अशी रुग्ण संख्या होती. एक अंकी रुग्ण संख्या अद्याप तेथे नोंदली गेली नाही. नगर शहर आणि अन्य काही तालुक्यांची लोकसंख्या पारनेरच्या तुलनेत जास्त असूनही तेथे तुलनेत कमी रुग्ण आहेत. त्यामुळे पारनेरने चिंता वाढविली आहे. त्यातूनच आता तालुक्यातील ग्रामस्थांना कडक लॉकडाउनला सामोरे जावे लागत आहे. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yWnOdd

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.