: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर वर्षभर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात आरोपी संतोष कचरू जाधव याला सोमवारी अटक करण्यात आली. तसंच त्याला गुरुवारपर्यंत (४ नोव्हेंबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. कदम यांनी दिले. या घटनेबाबत १५ वर्षीय पीडितेच्या आईने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, घटनेच्या काही दिवसांपूर्वी फिर्यादी व पीडिता या दोघी फिर्यादीच्या बहिणीकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. ७ ऑगस्ट २०२१ रोजी फिर्यादी व तिच्या बहिणीची सून या शेतात असता घरी फिर्यादीची मुलगी व बहीण अशा दोघीच होत्या. दुपारी १२ वाजेच्या सुमारास पीडिता ही कपडे वाळू घालण्यासाठी बाहेर गेली ती घरी परतलीच नाही. त्यामुळे फिर्यादीच्या बहिणीने ही बाब फिर्यादीला सांगितली. पीडितेचा शोध घेऊनही ती न सापडल्याने करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पीडिता ढोकसांवगी (ता. शिरुर, जि. पुणे) येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पीडितेला १८ ऑक्टोबर २०२१ ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता, आरोपी संतोष कचरू जाधव (२४, रा. देवीभोएरे, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याने वर्षभरापूर्वी लग्नाचे आमिष दाखवून तिला इसताईनगर (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे पळून आणले. त्यानंतर जांभळी (जि. अहमदनगर) येथे नेले. तिथे पाच महिने थांबल्यानंतर आरोपीने पीडितेला स्वत:च्या गावी आणले. यादरम्यान आरोपीने पीडितेवर वारंवार अत्याचार करुन तिला सहा महिन्यांची गर्भवती केले, असा जबाब पीडितेने दिला. प्रकरणाचा तपास बाकी आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रसंगी, आरोपीची वैद्यकीय तपासणी करणे, तसेच गुन्ह्यात आरोपीला कुणी मदत केली व आरोपीने पीडितेला कुठे-कुठे नेले, याचादेखील तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक लोकाभियोक्ता आर. सी. कुलकर्णी यांनी न्यायालयात केली. ही विनंती ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GFDIx8