: वेतन वाढीसाठी प्लांट मॅनेजरला वारंवार पैसे देऊनही वेतन वाढ न देता, उलट होणाऱ्या त्रासाला कंटाळून कंपनीतील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणात आरोपी प्लांट मॅनेजर मनोज काशिनाथ पवार याने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. सुंदाळे यांनी फेटाळला. मृत शिवनाथ कोलते (२८) यांचा भाऊ सोमिनाथ सखाराम कोलते (३२, रा. कविटखेडा, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, मृत शिवनाथ हे २०१४ पासून वाळूज येथे १८ हजार रुपयांच्या वेतनावर काम करत होते. १६ ऑक्टोबर रोजी शिवनाथ यांनी कचरु कोलते यांच्या गट क्रं. ८२ येथील शेतातील विहिरीत आत्महत्या केली. पोलिसांच्या पंचनाम्याच्या दरम्यान शिवनाथ यांच्या खिशात पोलिसांना चिठ्ठी सापडली. त्यात, माझ्या मृत्यूस मनोज पवार हा कारणीभूत असल्याचं व मोबाइलमध्ये सर्व काही टाईप करुन ठेवलं असल्याचं चिठ्ठीत नमूद करण्यात आलं होतें. मृत शिवनाथ यांनी फिर्यादीला मृत्यूपूर्वी सांगितलं होतं की, मॅनेजर मनोज पवार हा गेल्या दोन वर्षांपासून वेतन वाढीचे आश्वासन देत होता. त्याने शिवनाथ यांना वेतन वाढ देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील ८० हजार रुपये शिवनाथ यांनी त्याला दिले होते. उर्वरित २० हजार रुपयांसाठी आरोपी हा शिवनाथ यांना त्रास देत होता व ‘हा व्यवहार घरी सांगू नको’ अशी धमकी देखील पवार हा शिवनाथ यांना देत होता. या घटनेनंतर वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी आरोपी मनोज पवार याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला असता, न्यायालयाने तो फेटाळला. या प्रकरणात सहायक लोकाभियोक्ता एम. एम. अदवंत यांनी काम पाहिले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZIZijq