मुंबई: मुंबईत शनिवारी (१७ जुलै) रात्री अचानक पावसाचा जोर वाढला आणि रात्रभर पावसाने धुमाकूळ घातला. मुंबईतील अनेक भाग जलमय झाले तर चेंबूर, आणि भांडुप अशा तीन ठिकाणी दरडी कोसळून हाहाकार माजला. या तिन्ही दुर्घटनांत ३० जणांना आपला जीव गमवावा लागला. यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तुफान पावसात अग्निशमन दलाने मदत आणि बचावकार्य केले. यातील विक्रोळी सूर्यनगरच्या डोंगरात अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून केलेल्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार या जवानांनीच 'मटा ऑनलाइन'कडे कथन केला आहे. ( ) वाचा: अग्निशमन दलाच्या विक्रोळी केंद्रातील जवान विनायक देशमुख यांनी संपूर्ण टीमच्या बचावकार्याचा जो घटनाक्रम सांगितला आहे तो काळजाचा थरकाप उडवणारा असाच आहे. जाणून घ्या त्या रात्री नेमकं काय घडलं... मुंबईत शनिवारी रात्री पावसाचा जोर वाढला. अनेक सखल भागात, इमारतीत, झोपडपट्टीत पाणी साचून हाहाकार उडाल्याच्या बातम्या येत होत्या. रेल्वेचे रूळ पूराच्या पाण्यात अदृश्य झाल्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली होती. संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर वाढतच चालला होता. काही अघटीत घडल्यास येणाऱ्या स्थितीला तोंड देण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. आपत्कालीन यंत्रणांत आमचं आघाडीवर होतं... रात्र पुढे सरकत होती. पाऊसही थांबायचे नाव घेत नव्हता. इतक्यात भागातून विक्रोळी फायर स्टेशनमध्ये फोन खणाणला. सूर्यनगर या डोंगर उतारावर वसलेल्या विभागात संरक्षक भिंत कोसळून चार-पाच घरे दलदलीत गाडली गेली होती. या घरांतील कुटुंबे त्यात अडकली होती. रात्री तीनची वेळ म्हणजे सगळेच गाढ झोपेत होते आणि झोपेतच या कुटुंबांवर काळाने झडप घातली. या घटनेची वर्दी मिळताच आम्ही सारे सज्ज झालो. विक्रोळी अग्निशमन केंद्रातील सेकंड टर्नाऊट एफटी-५ हे फायर इंजिन या वर्दीवर निघाले. अतिवृष्टीमुळे सगळीकडूनच सतत कॉल सुरू होते. त्यामुळे एमपी-४१ हे फर्स्ट टर्नाऊट फायर इंजिन इतर कॉलवर होते. अशावेळी एफटी-५ लीडिंग फायरमन क्रू तात्काळ वर्दीवर रवाना झाले. सोबत रेस्क्यू व्हॅनलाही पाचारण करण्यात आले. वाचा: . संततधार कोसळणारा पाऊस, काळाकुट्ट अंधार आणि आर्त किंकाळ्या यामुळे सारा परिसर गलबलून गेला होता. या स्थितीत खरं आव्हान होतं ते आमच्या टीमपुढे. सूर्यनगरचा बहुतांश भाग हा डोंगर उतारावर वसलेला असल्याने दुर्घटनेच्या ठिकाणी वाहने पोहचण्यासाठी रस्ताच नव्हता. त्यामुळे वाहने खालीच उभी करून आवश्यक ते साहित्य सोबत घेऊन जवान अरुंद गल्ल्यांमधून चालत त्या ठिकाणी पोहचले. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे लोक भयभीत झाले असले तरी अनेक तरुणांनी चिखलाचे ढिगारे उपसून आत गाडले गेलेल्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. दुर्घटनेचे गांभीर्य ओळखून नियंत्रण कक्षाला दुर्घटनेचे स्वरूप आणि आणखी कुमक पाठवण्याची वर्दी दिली व शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. प्रतिकूल स्थितीमुळे बचावकार्य अत्यंत जोखमीचे होते. तरीही टिकाव, फावडे, पहारी, घमेली यांच्या सहाय्याने त्या घरांवर पडलेला चिखल आणि मोठे दगड बाजूला करून आत अडकलेल्यांचा शोध घेण्याचे अत्यंत कष्टप्रद काम सुरू झाले होते. तोपर्यंत दुसऱ्या कॉलवर गेलेले एमपी-४१ हे फायर इंजिन तसेच मदतीसाठी कुर्ला अग्निशमन केंद्राचे फायर इंजिनही वर्दीवर पोहचले होते. वाचा: जवानांचे युनिफॉर्म आणि शरीर पावसात सुद्धा घामाने आणि चिखलाने माखले होते. कोरडी माती आणि दगड लवकर बाजूला करता येतात पण चिखल उचलणे फारच जिकिरीचे असते. अनेक उपकरणे गाडीत, रेस्क्यू व्हॅनमध्ये असली तरी गाड्या खूप दूर असल्यामुळे ती उपकरणे घेऊन जाता येत नव्हते. चीपिंग हॅमर, लिफ्टिंग बॅग, वेगवेगळी कटर्स, स्प्रेडर्स ही विजेवर आणि जनरेटरवर चालणारी उपकरणे असल्यामुळे एवढ्या उंचीवर आणि अडचणीत काहीच उपयोगाची नव्हती. थोडक्यात तेथील संपूर्ण काम हे मनुष्यबळावरच करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. एरवी शेजाऱ्याशीही पटत नसले तरी जेव्हा दुर्घटना घडते तेव्हा मात्र माणुसकीचे दर्शन घडवणारा तो मुंबईकर! हो ही माणुसकी तिथे पाहायला मिळाली. अग्निशमन जवानांना मदत करण्यासाठी अनेक हात सरसावले होते. जवानांनी टिकाव फावड्यांनी घमेल्यात भरलेला मलबा स्थानिक तरुण रांग करून अत्यंत वेगाने बाहेर काढत होते. अनेक सामाजिक कार्यकर्ते कष्टप्रद काम चाललेल्या ठिकाणी पाणी, चहा, बिस्किटे आणून देत होते. पावसाच्या पुराबरोबर माणुसकीचाही पूर आल्याचे अनोखे दृष्य आम्ही अनुभवत होतो. वाचा: एका घराच्या दरवाजाजवळ चिखलात पूर्णपणे दबलेला एक मनुष्य सापडला. अर्थात त्याचा श्वास कधीच बंद झाला होता. नाइट शिफ्टच्या जवानांनी दोघांना बाहेर काढले होते. सकाळी फर्स्ट शिफ्टचे नव्या दमाचे क्रू रात्रपाळीच्या जवानांना रीलीव्ह करण्यासाठी आले. पुन्हा जोमाने काम सुरू झाले. तोपर्यंत एनडीआरएफची टीमसुद्धा मदतकार्यासाठी दाखल झाली. एका बाजूने एनडीआरएफ आणि दुसऱ्या बाजूने मुंबई अग्निशमन दल आणि या दोन्ही टीमना सहकार्य करणारे स्थानिक तरुण! वेगाने ढिगारा हटविण्याचे काम सुरू असताना...एका महिलेचा हात मलब्यात दिसून आला. अगदी हळूवारपणे मलबा काढून तो थंडगार पडलेला माऊलीचा देह बाहेर काढताना बाजूलाच आणखी एक चिमुकला पाय जवानांच्या दृष्टीस पडला. हळूवारपणे तो चिमुकला देह बाहेर काढल्यावर उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले. साधारण तेरा वर्षे वयाची त्या माऊलीची लेक..! कितीही धोकादायक आणि धाडसाचे काम करत असले तरी अग्निशमन जवान ही सुद्धा माणसंच असतात. ते गतप्राण झालेले मायलेकीचे देह उचलताना जवानांची झालेली अवस्था शब्दांच्या पलीकडची होती. अव्याहतपणे कोसळणारा पाऊस, वाहून येणारा मलबा आणि पुन्हा दरड कोसळण्याची भीती असूनही ढिगाऱ्याखाली कुणीतरी जिवंत असू शकतो या भावनेने अग्निशमन दलाच्या जवानांचे बचावकार्य सुरूच होते. विषाणू, जीवाणू, एखादा संसर्गजन्य आजार यापैकी काहीही होण्याची शक्यता फार मोठी असते. परंतु, अग्निशमन जवान हे कार्य केवळ नोकरी म्हणून नाही तर जनसेवेचा वसा म्हणून करत असतो. त्यामुळे बचावकार्य पूर्ण होईपर्यंत थांबायचे नाही हा आमचा दंडक असतो आणि विक्रोळीत जीवाची बाजी लावून आमच्या जवानांनी त्याच भावनेने काम केले. एनडीआरएफच्या जवानांनी दोन तर आमच्या जवानांनी ढिगाऱ्यातून सात मृतदेह बाहेर काढले. विक्रोळी फायर स्टेशनचे प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब आणि उपप्रमुख अग्निशमन अधिकारी संतोष सावंत यांच्या नेतृत्वाखील जवानांनी हे धाडसी बचावकार्य केले. डीएफओ गिरकर, राणे, एडीएफओ दोंदे, करलकर, एसओ सोनावणे, पाटील आणि विक्रोळी तसेच कुर्ला अग्निशमन केंद्राचे जवान तीन शिफ्टमध्ये अखंडपणे हे बचावकार्य करत होते. पण या घटना कधी थांबणारच नाहीत का, हा आता खरा प्रश्न आहे. मुंबईत दरवर्षी पहायला मिळणारे हे भयाण वास्तव आहे. आपण तितक्यापुरती हळहळ व्यक्त करतो. चर्चा करतो, थोड्याच दिवसात हे सर्व विसरून पुन्हा असे काही घडल्यावर जागे होतो. अर्थात आपल्या हातात काही नाही हेही खरेच. पण आता खरोखरच यावर ठोस उपाययोजना व्हावी असे वाटते आहे आणि तशी कळकळही आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणांनी पावले उचललीच पाहिजेत पण डोंगराळ भागात अतिक्रमण करून उभ्या राहत असलेल्या झोपड्यांनाही आवर घालण्याची व रहिवाशांवरही काही निर्बंध घालण्याची तितकीच आवश्यकता आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36PaafA