अकोलाः अकोल्यात २२ जुलैला पडलेल्या पावसाने संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजवला होता. मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्हात गेल्या २२ जुलैला झालेल्या पावसाची नोंद ही जागतिक पातळीवर झाली असून अकोला जिल्हात २४ तासात १८४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. () गेल्या पाच सहा दिवसांपासून राज्यात पावसानं थैमान घातलं आहे. अकोल्यातही व्याळा ते रिधोरा दरम्यान ढगफुटी सदृश स्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळं शहरातील अनेक घरात पाणी शिरले होते. शहरातील कौलखेड, खडकी, डाबकी रोड, जुनेशहर, शिवसेना वसाहत या भागात पावसाच्या पाण्याने थैमान घातले होते. या संपूर्ण भागात पूर परिस्थिती निर्माण झाली असून ५ ते ८ फुटापर्यंत पाणीच पाणी साचले होते. जिल्हातील अनेक भागात नदी आणि नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. हजारो हेक्टर शेती पाण्यामुळे वाहून गेल्यामुळं शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. अकोला जिल्ह्यात गुरुवारी २२ जुलैला झालेल्या पावसाची नोंद ही जागतिक पातळीवर झाली आहे. जगातील सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या यादीत अकोला जिल्ह्याचे नाव हे आठव्या क्रमांकावर आहे. गुरुवारी जिल्ह्यात १८४. ८ मिमि पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंतच्या इतिहासात अकोल्यात असा पाऊस कधीच झाला नव्हता, असं अकोल्यातील रहिवाशांचं म्हणणं आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत आहे. तर राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड अशा अनेक भागात या मुसळधार पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी भयावह पूरसदृश्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. काही ठिकाणी या पावसाने अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले आहे, तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस? जिल्हा – पाऊस – टक्केवारी १) बुलडाणा – ३५४.९ मिमी – १२५.९ टक्के २) अकोला – ३४१.२मिमी ११२.८ टक्के ३) वाशिम – ४९८.४ मिमी १४३.६ टक्के ४) अमरावती – ३९०.९ मिमी १११.२ टक्के ५) यवतमाळ – ५१०.६मिमी १४५.८टक्के
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36W4u3L