: चिपळूण शहराला पावसाचा तडाखा बसला असून महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याची पातळी सतत वाढत आहे. मुसळधार पावसामुळे शहरात दोन बळी गेल्याची प्राथमिक माहिती आहे. एक महिला पाण्यात बुडाली असून दुसरी वाहून गेल्याची माहिती आहे. एकविरा मंदिर परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाला पुराच्या पाण्यातून बाहेर काढताना एका वयोवृद्ध महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पाणी वाढत असताना तिला अंदाज आला नाही. सदनिकेत पाणी वाढल्यानंतर जीव वाचवण्यासाठी ती घराबाहेर पडली, तेव्हा पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. संबंधित माहिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. दुसरीकडे, बेंदरकर आळी येथील एक महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. पुराचा सामना करण्यासाठी चिपळूण नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा पावसाळ्यापूर्वी सज्ज होती. तीन बोटी, लाईफ जॅकेट, दोरखंड आणि इतर सामग्रीचा आपत्कालीन यंत्रणेत समावेश होता. सदरची यंत्रणाही इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या परिसरातील अग्निशमन केंद्रात ठेवण्यात आली होती. अग्निशमन केंद्रही पाण्याखाली गेल्यामुळे पालिकेची आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वयित नाही. दरम्यान, पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीत पालिकेच्या अधिकाऱ्यांना फोनवरुनही संपर्क होत नाही. पालिका परिसरही पाण्यात गेला आहे, त्यामुळे पालिकेतील अधिकारी चिपळूण पोलिस ठाण्यात आले आहेत. पोलिस ठाण्यातून शक्य होईल तेवढे मदत कार्य सुरू आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iCnAkJ